समाजाच्या समस्या लोकसभेतून सोडवणार ! खासदार.संजय देशमुख : सकल मराठा समाज व पुसद अर्बन बँकेतर्फे सत्कार संपन्न…
पुसद,ता.१५ :लोकप्रतिनिधींनी काम न केल्यास त्यांना जाब विचारणे हा मतदारांचा हक्क आहे. मला निवडून आणण्यासाठी समाजबांधवांनी स्वत: निवडणूक हातात घेऊन प्रचार केला त्यामुळे मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांच्या समस्या लोकसभेतून सोडवणार असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार.संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
ते पुसद येथील सकल मराठा समाज व पुसद अर्बन बँकेतर्फे पुसद अर्बन बॅंकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी(ता.१४) आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी (शरद पवार) काॅग्रेसच्या लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अँड.आशिष देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप,डॉ.मोहम्मद नदिम,अँड. रमेश पाटील,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, प्रयोगशील शेतकरी संभाजी टेटर, माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे,प्रविण शिंदे,पंजाबराव देशमुख खडकेकर,अशोक बाबर,राजेश सोळंके,नितिन पवार,शिवाजी कदम,जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष शुभांगी पानपट्टे, सकल मराठा समाजाच्या डॉ.आशा कदम ,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मंदा इंगोले ,उज्वला खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर स्वरा राजेश भाकरे हिने जिजाऊ वंदना सादर केली.
यानंतर सकल मराठा समाजातर्फे शरद मैंद,शिवाजी कदम,दिलीप पाटील कान्हेकर,संभाजी टेटर,किरण देशमुख सवनेकर,बंडू पारटकर,यशवंत देशमुख आदिंनी विद्यमान खासदार.संजय देशमुख यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.तसेच यावेळी पुसद अर्बन बॅंक व संचालक मंडळ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्यातर्फेही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.आशिष देशमुख यांनी केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असतांना देखिल मराठा समाजाला कायद्यात टिकणारे ओबीसीतून आरक्षण दिले नसल्याने मराठा समाजाने एकजूट दाखवून शक्तीचे प्रदर्शन केले असून आरक्षणाला राजकीय स्वरुप येऊ देऊ नका,गैरसमज पसरवणार्यांपासून सावध राहा,एकजूट कायम ठेवा असे उपस्थित समाजबांधवांना आवाहन करुन खासदार देशमुख हे आपल्या समस्या सोडवतील असा आशावाद व्यक्त केला.
प्रास्ताविकातून शरद मैंद यांनी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाने महारास्ट्राला मराठा समाजाची ताकद काय असते हे दाखवून दिले. जरांगे व डिएमके फॅक्टरचा फायदा झाल्याने त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहेत असे सांगून पुसद येथे मराठा समाजासाठी सुरु असलेल्या समाजभवनासाठी दोन कोटींच्या कामात आणखी दोन कोटींची भर टाकावी तसेच मराठा समाजासाठीचे वसतिगृह व स्टडी सर्कलच्या कामासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन खासदार.संजय देशमुख यांना केले.
राम देवसरकर यांनी मराठा कुणबी समाजाचे पुसद व यवतमाळ येथील रखडलेल्या वसतिगृहाचे व समाजभवनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठीचे नेतृत्व खासदार.संजय देशमुख यांनी करावे अशी मागणी केली.यावेळी जरांगे पाटील समर्थक शिवाजी कदम यांनी मराठा समाजाला कुठल्याही समाजाचे आरक्षण हिरावून न घेता जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची भूमिका विषद करुन संजय देशमुखांना निवडून आणण्यासाठी पुसद विधानसभा मतदार संघात गावोगावी कशाप्रकारे प्रचार केला ते विषद केले.यावेळी दिगंबर जगताप यांनी समायोचित भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले.उपस्थितांचे आभार नितिन पवार यांनी मानले.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व मराठा समाजबांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते..