हिंगोली–नर्सी नामदेव येथील यात्रोत्सवाला प्रारंभ..

प्रतिनिधी हिंगोली शिवाजी कऱ्हाळ
हिंगोली तालुक्यातील श्री.क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मस्थान नर्सी नामदेव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ता.२६ पापमोचने भागवत एकादशी पासून मिठाच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे.
या निमित्ताने सकाळी १० वाजता मागील अनेक वर्षांच्या परंपरेनुसार नर्सी पोलीस ठाण्याच्या वतीने श्री च्या समाधीस मानाचा आहेर अर्पण करण्यात आला.
यावेळी नर्सी पोलीस ठाण्याचे सपोउपनि नागोराव जाधव तसेच अशोक कळंबे सपत्नीक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी संस्थांनचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सचिव द्वारकादास सारडा, रमेश महाराज मगर,शैलेश चौधरी,महादू काळे,राम धुमाळ, हेमंत दराडे,प्रविण शिरफुले, हेमराज गीते, खंडुजी पाटील,बंडु नितनवरे,आदी संस्थांचे पदाधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
महापूजेनंतर पंचक्रोशीतील भाविकांनी श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखी नामाचा गजर करीत दर्शनासाठी दाखल झाले होते.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातून दिंड्या दाखल झाल्या आहेत.
गुरुवारी दुपारी श्री ची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून शुक्रवारी सकाळी मंदिर परिसरात काला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे.