पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी.) पक्षाकडून उमेदवारीसाठी शरद मैंद यांचे नाव चर्चेत…

पुसद : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी
पुसद मधून राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी.) पक्षाकडे आतापर्यंत ७ जणांनी उमेदवारी मागितली आहे. दि. १० रोजी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांच्याकडे ईच्छुक म्हणुन अर्ज केला आहे. सन२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर इंद्रनिल मनोहरराव नाईक हे उभे राहिले आणि निवडूनही आले. एक वर्षापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजितदादा गटात आ.ॲड. इंद्रनिल नाईक सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष पुसद ,मध्ये संपणार असा काही लोकांचा अंदाज होता. तो अंदाज आता फोल ठरला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला पुसद विधानसभा सुटणार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रत्यक्ष ७ व अप्रत्यक्ष अनेक ईच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे. आतापर्यंत ७ ईच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याची माहिती जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांनी दिली. त्यामध्ये राकाँ शरद पवार लिगल सेल प्रदेशाध्यक्ष अँड.आशिष देशमुख, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, माजी जि.प.उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक , संचालक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रा.शिवाजी राठोड , माजी उपायुक्त समाज कल्याण विभाग म. रा. माधवराव वैद्य, य.जि.मध्य बँक चे पुसद विभागीय अध्यक्ष अनूकुल चव्हाण व सौ. वर्षा माधवराव वैद्य या दिग्गजांचा
समावेश आहे.
महाविकास आघाडीकडे ईच्छुकांची रिघ
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सौ. राजश्रीताई हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट) यांचा उबाठाचे उमेदवार संजय देशमुख यांनी १ लाखाच्यावर मतांच्या फरकामध्ये पराभव केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे सर्वात जास्त ईच्छुकांची रांग लागली आहे. पुसद
विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटणार हे जवळजवळ निश्चित झाल्यामुळे ७ दिग्गजांनी उमेदवारी मिळावी म्हणुन अर्ज केला आहे. पक्ष कोणाला अनुकूल राहणार आणि कोणाच्या हातात तुतारी देणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
आ.ॲड.इंद्रनिल नाईक यांचा या
निवडणुकीत कस लागणार?..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आ. इंद्रनिल नाईक हे केवळ ९ हजाराच्या फरकाने विजयी झाले. त्यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे महायुतीमध्ये सामील झालेल्या अजितदादा राकाँ गटात ते आहेत.त्यांचा पारंपारिक मुस्लिम मतदार मात्र आता महाविकास आघाडीकडे वळल्यामुळे त्यांची काही प्रमाणात वोट बँक कमी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आ.ॲड.इंद्रनिल नाईक यांचा चांगलाच कस लागणार आहे. त्याचबरोबर अनु. जमाती, अनु. जाती व ओबीसी वर्ग, मराठा सुध्दा महायुती सरकारच्या
विरोधात असल्याचे सध्या तरी चित्र आहे. अशातच त्यांच्या जवळचे मित्र परिवार सुध्दा त्यांच्यापासून फारकत घेवून महाविकास आघाडीकडे वळले आहेत हे येथे उल्लेखनिय.
दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा २०१९ च्या निवडणुकीमध्ये ८० हजार मतदान घेतलेले अॅड. निलय नाईक हे येत्या विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.
दानशूर शरद मैंद
मागील वीस वर्षापासून पुसद अर्बन बँकेचे ते अध्यक्ष आहेत. पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून त्यांनी अनेक विधायक कामे केली आहेत. पुसद अर्बन बँकेचे संपूर्ण महाराष्ट्रात जाळे विणले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय काम आहे.अनेक नैसर्गिक संकटात ते पुसद विधानसभा क्षेत्रात तन-मन-धनाने जनतेची सेवा करत आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात शरद मैंद सर्वात पुढे असतात. त्यांचा फार मोठा मिञ परीवार आहे.मित्र परिवाराच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणुक लढण्याची तयारी सुध्दा केली आहे.नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे ईच्छुक म्हणुन अर्ज दाखल केला आहे. जर मला उमेदवारी मिळाली तर ताकदीने लढू आणि पुढील काळात पक्षाचे काम करीत राहू असे त्यांनी सांगितले असून शरद मैंद यांना उमेदवारी मिळावी यासाठी जनतेतून ही त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

